सावर्डे खुर्द कुस्ती मैदानात प्रदीप ठाकूर विजेता, शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या ; ग्रामदैवत अंबाबाई यात्रेनिमित्त मैदानाचे आयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सावर्डे खुर्द (ता.कागल) येथील ग्रामदैवत अंबाबाई यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती सांगली येथील मल्ल प्रदीप ठाकूर विरुद्ध शाहूपुरी तालमीचा मल्ल शशिकांत बोंगार्डे यांच्यात झाली. चाळीस मिनिटे चाललेल्या या कुस्तीत प्रेक्षकांना डाव-प्रतिडाव पाहायला मिळाले.
वजनाने व उंचीने कमी असणाऱ्या शशिकांत बोंगार्डे यांने प्रदीपला आकडी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु उंची आणि वजनाचा फायदा घेत प्रदीपने तो चपळाईने परतवला. त्यानंतर प्रदीपने शशिकांतवर कब्जा घेत चिटपट करण्याचा प्रयत्न केला. पण शशिकांतने तो विद्युतगतीने परतावून लावला. शशिकांतने स्वारी मारण्याचा प्रयत्न केला. विसाव्या मिनिटाला प्रदीप ठाकूरने शशिकांतच्या एकलंगी डावातून सुटका करून घेतली. शशिकांत एकेरी पट काढत प्रदीप ठाकूरला चिटपट करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मल्लांमध्ये काटा लढत होत होती. अर्धा तासानंतर कुस्ती निकाली होत नाही म्हटल्यानंतर पंचांनी दोन्ही मल्लांना दहा मिनिटे पुन्हा दिली. चाळीस मिनिटानंतर कुस्ती गुणावर घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळणाऱ्या शशिकांत बोंगार्डेच्या पाठीवर जात प्रदीप ठाकूरने पहिला गुण मिळवत विजय संपादन केला.
विजयी उमेदवार प्रदीप ठाकूरला याला पुणे येथील उद्योजक राजाराम पाटील म्हाकवेकर यांच्या हस्ते बक्षीस व चषक देण्यात आला. यावेळी उद्योजक अनिल चौगुले, हिंदुराव मालवेकर, सागर मालवेकर, समाधान तळेकर, सिताराम मालवेकर, विजय मांगले रंगराव कांबळे, महादेव मोगणे उपस्थित होते.
द्वितीय क्रमांकची कुस्ती गंगावेश तालमीचा मल्ल तानाजी मेढे विरुद्ध साके येथील सुभाष निउंगरे यांच्यात झाली. ताकतीने समान असणाऱ्या दोन्ही मल्लांनी डाव-प्रतिडाव केले. मेढे याने एकरीपट काढण्याचा प्रयत्न केला. तो सिताफीने निउंगरेने परतावून लावला. तानाजी मेढे यांनी दुहेरीपट काढत सुभाष निउंगरेला चितपट करण्याचा प्रयत्न केला पण तोही असफल झाला. सुभाषने तानाजीच्या मानेचा कस काढत त्याला एकलंगी डावावर चितपट केले.
तृतीय क्रमांकाची लढत सांगली येथील मल्ल ओंकार कारंडे विरुद्ध गोरंबे येथील मल्ल विनायक वास्कर यांच्यात झाली. वास्कर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कारंडे याला हप्ते मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर कब्जा घेत मानेचा कस काढला. वास्करने कोंदे एकचाक डावावर कारंडेला चिटपट करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
मैदानातील अन्य विजयी उमेदवार असे : सुरज पालकर (सिध्दनेर्ली),रोहन कांबळे (सावर्डे खुर्द), हर्षवर्धन एकशिंगे (शाहू साखर केनवडे), हर्षवर्धन माळी (शाहू साखर म्हाकवे), प्रताप पाटील (बेलवळे),विवेक चौगुले (एकोंडी), अतुल मगदूम (इस्पुर्ली), श्रीपाल भोसले (पिराचीवाडी), सोहम सुतार (वडकशिवाले),पवन वाघमोडे (गोरंबे), राहुल पाटील (चौंडाळ) इंद्रजीत बोडके, किरण कासोटे (शेंडूर) सार्थक पाटील (सावडे बुद्रुक), पृथ्वी शेवाळे (करनुर), हर्षवर्धन राजगिरे (दिंडनेर्ली), आदिनाथ मालवेकर,अनिल डाफडे, आरव मालवेकर, साहिल मालवेकर (सावर्डे खुर्द).
मैदानात लहान-मोठ्या शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. पंच म्हणून दत्तात्रय एकशिंगे, बाबुराव मालवेकर, सर्जेराव पाटील, अशोक फराकटे, भिकाजी मालवेकर, गजानन पाटील,संभाजी घराळ, मारुती पोवार यांनी काम पाहिले. मैदानाची निवेदन राजाराम चौगुले, कृष्णा चौगुले यांनी केले.मैदानाचे संयोजन समाधान तळेकर,सिताराम मालवेकर, सागर मालवेकर,विजय मांगले, रंगराव कांबळे,महादेव मोगणे,हिंदूराव मालवेकर,आनंदा ज्ञा डाफळे, तानाजी मोगणे,आनंदा लोहार, अशोक डाफळे,मारुती पसारे यशवंत तुरंबेकर यांनी केले.