‘मी काय भाजपचा ठेका घेतला नाही’; खासदार संभाजीराजे आक्रमक

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. गेल्या सरकारने बोगस कायदा केला का या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीटपणे भूमिका मांडली नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली करत आहेत. त्यामुळे आंदोलन काय असतं हे इतरांनी मला शिकवू नये. मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल, असे संभाजीराजे यांनी म्हटले.
ते गुरुवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणासाठी मी माझा महाल सोडून राज्य पिंजून काढत आहे. ही वेळ आक्रमक होण्याची नाही.
प्लेगच्या साथीच्यावेळीही राजर्षी शाहू महाराजांनी असाच संयम दाखवला होता. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
पुढे मी 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे. माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.