विजेचे प्रीपेड मीटर जोडणी तात्काळ थांबवा अन्यथा उग्र आंदोलन करू : हमिदवाडा येथील नागरिकांचे निवेदन

निकाल न्यूज प्रतिनिधी :
हमिदवाडा गावांमध्ये वीज कनेक्शन धारकांची जुनी मीटर काढून नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर न बसवण्याचे संदर्भात तसेच ही मीटर जोडणी तात्काळ बंद करणे संदर्भात महावितरण डिव्हिजन ऑफिस मुरगुड तसेच सबस्टेशन सोनगे यांना आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्याकडून तसेच हमीदवाडा ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्याकडून निवेदन देण्यात आले.
महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना अदानी कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे.या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आलेली आहेत व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे. वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत.
केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीजदरनिश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीजदराढीच्या रुपाने ९ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणनूच ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे,त्यामुळे आम्ही या स्मार्ट/ प्रीपेड मीटर्सना संपूर्ण विरोध करीत आहोत व खालील प्रमाणे मागण्या करीत आहोत.
१. वीज कायदा २००३ मधील अधिनियम क्रमांक ४७(५) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंघित ग्राहकांना आहेत. कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंगन करीत आहे, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ग्राहक म्हणूनू आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा आहे. तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.
२. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर्स नुसार मीटर्सचा खर्च १२०००/ – रु. प्रति मीटर याप्रमाणे आहे. प्रीपेड मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर ९००/ – रु. अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी १११००/ – रू.प्रति मीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे. या कर्जास आमची मान्यता नाही व आम्ही हा मीटर घेणार नाही. त्यामुळे हा खर्च आमच्यावर लादता येणार नाही. या खर्चामुळे या कर्जावरील व्याज, घसारा व संबंधित खर्च इ. कारणासाठी वीज दरामध्ये वाढ होणार आहे. ही वाढ अंदाजे किमान ३० पैसे प्रति युनिट व अधिक होईल. आम्ही हा मीटर वापरणार नसल्यामुळे या वाढीव दराचा कोणताही बोजा आमच्यावर लावता येणार नाही याची नोंद घ्यावी..
अशा मागण्यांचे पत्र कनिष्ठ अभियंता सोनगे व सहाय्यक अभियंता मुरगूड यांना दिले वरील मागण्यांची नोंद घ्यावी आणि याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी ही विनंती निवेदनाद्वारे केली, हमिदवाडा गावातील २१ प्रीपेड मीटर ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता घरात कोणी नसताना बसवलेले आहेत तरी ती नवीन बसवलेली २१ प्रीपेड मीटर येत्या दोन दिवसात आपल्या विभागामार्फत काढून पूर्ववत जुनी मीटर बसवावीत सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयल्न केल्यास आम्ही याला तीव्र विरोध करू असा सज्जड दम सुद्धा यावेळी देण्यात आला.
वरील मागण्या येत्या २ दिवसात पूर्ण कराव्यात व हमिदवाडा गावात जोडलेले २१ मीटर तात्काळ काढावेत अन्यथा आम्ही हमिदवाडा गावाच्या वतीने हमीदवाडा बस स्टॅन्ड सर्कल येथे दिनांक २३/०१/२०२५ रोजी तीव्र आंदोलन छेडू असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ,सरपंच कृष्णात बुरटे,उपसरपंच उमेश डावरे,समीर देसाई युवा सेना जिल्हाउपाध्यक्ष,महेश जाधव, दादासो सुळकुडे, नरसिंह भोसले,राहुल टिकले, आनंदा रंगापुरे, एकनाथ ठाणेकर, रंजीत वासनकर,कमलेश रंगापुरे,अंकुश दूरडे,विनायक सुळकुडे, सचिन दंडवते,दादासो पाटील, सचिन पारले,राजू रांगापुरे,बापू कोले, कृष्णत हसोले,संजय सुळकुडे ग्रामस्थ उपस्थित होते.