स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रा.डॉ.बाबुराव घुरके यांचे व्याख्यान

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर येथील कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स, कोल्हापूर येथे शनिवार दि. ११ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सदर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथील भूगोल विषयाचे प्राध्यापक डॉ. बाबुराव घुरके उपस्थित होते.
आपल्या मनोगतात डॉ. घुरके म्हणाले की, “स्वामी विवेकानंद यांचे विचार हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. स्वामी विवेकानंद यांनी आपले संपूर्ण जीवन मानवजातीच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांचे विचार केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी दिशादर्शक होते. स्पर्धात्मकता, मानसिक ताण, करिअर बाबतची अनिश्चितता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर यामुळे आजचा तरुण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अशावेळी तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य प्रा. डॉ. सौ. ए. ए. गावडे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा. एस. पी. कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.