कागलमधील तीर्थस्थळांच्या विकासासाठी साडेअकरा कोटी निधी मंजूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती ; “ब” वर्ग तीर्थस्थळ योजनेंतर्गत सहा देवालयांचा समावेश

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील विविध तीर्थस्थळांच्या विकासासाठी तब्बल साडेअकरा कोटी निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या “ब” वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेंतर्गत तालुक्यातील सहा तीर्थस्थळांच्या विकास आणि परिसर सुधारण्यासाठी हा निधी मंजूर झाला. यामध्ये कागल तालुक्यातील पिराचीवाडी, आनुर, बामणी, लिंगनूर कापशी, निढोरी व मेतके येथील मंदिरांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या “ब” वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मंदिरांची गावनिहाय यादी अशी, श्री. गहिनीनाथ देवालय, पिराचीवाडी -दोन कोटी, हनुमान मंदिर, आणूर- दोन कोटी, हनुमान मंदिर, बामणी- दोन कोटी, श्री. भावेश्वरी देवालय, लिंगनूर कापशी – दोन कोटी, श्री. महादेव मंदिर, निढोरी- दीड कोटी, श्री. बाळूमामा सत्यवादेवी मंदिर, मेतके- दोन कोटी.
या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून मंदिरांसमोरील सभामंडप, स्त्री व पुरुष भक्तनिवास, यात्रीनिवास, भक्तनिवास, विद्युतीकरण, परिसर सुधारणा, पालखी मार्ग, संरक्षक भिंती, वाहनतळ, पोहोच रस्ते, स्वच्छतागृहे आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.