ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वयाच्या नव्वदितही जोपासला आजोबांनी टेलरिंग व्यवसाय : आमजाई व्हरवडे येथील दौलू पाटील यांची यशस्वी जीवनगाथा

कुडूत्री प्रतिनिधी :सुभाष चौगले

वय वर्षे नव्वद, या उतारवयात वयोवृद्धांनी विश्रांती घेण्याचे दिवस पण या वयातही आमजाई व्हरवडे(ता.राधानगरी) येथील आजोबांनी आपला टेलरिंग व्यवसाय न थकता सुरू ठेवला आहे.खरोखरच आजच्या पिढीसाठी त्यांचे आजचे काम आदर्श असेच आहे.एवढेच नव्हे तर आपले टेलरिंग व्यवसायाचे ज्ञान आपल्या मुलाला देखील देऊन त्याला त्याच्या पायावर उभे केले आहे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला मिळेल त्या वेळेचा सदुपयोग आपल्या कुटुंबासाठी करत आहे.ते सद्गृहस्थ म्हणजे दौलू म्हादु पाटील हे होत.
गावातील आबा,तात्या या टोपण नावाने सर्वांशी परिचित,पांढरा सदरा,डोक्याला फेटा,पंजे,अथवा हाफ पँट,डोळ्यावर चष्मा,असा त्यांचा दिसण्यातील रुबाब, तिसरी पर्यंतचे शिक्षण,तुटपुंजी शेती आणि गुरेढोरे सांभाळत वयाच्या सोळाव्या वर्षी गावातील आपले मामा तुकाराम बजाप्पा वरुटे यांचेकडून टेलरिंग व्यवसायाचे ज्ञान मिळवले.टेलरिंग व्यवसाय सांभाळत आपल्या कुटुंबाला आधार दिला.त्यांचा एक मुलगा टेलरिंग व्यवसाय सांभाळतो तर दुसरा मुलगा भोगावती येथे फर्निचर दुकानात काम करतात.
पाटील हे वारकरी संप्रदायातील असल्याने आजही त्यांनी आपले शरीरयष्टी धडधाकट ठेवली आहे.अजूनही काम करण्याची धडपड त्यांच्या अंगी आहे.आजही त्यांनी शेताकडे फेरफटका मारणे आणि जमेल ते काम करणे असा दिनक्रम सुरू ठेवला आहे.सामाजिक कार्याची आवड असून भजन,प्रवचन,कीर्तनाबरोबर,शाहिरी गाण्यांची आवड देखील आहे.
आज हे वयोवृद्ध आजोबा उतारवयात असले तरी ते समाजात मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.मुलगा संभाजी यांनी सुद्धा शाहिरी गाण्यात आवड,गोडी आणि रुची वडिलांकडून मिळवली आहे. आजोबांच्या स्वभावात गोडी आणि रुची असल्याने गावातील ते सर्वांचे लाडके आहेत.आजही त्यांच्याकडे काम करताना पाहिले की दुसऱ्यालाही काम करण्याची प्रेरणा निश्चितच मिळेल.त्यांचा आदर्श घेण्यासारखाच आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks