कागल तालुक्यातील यमगे येथे कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंचा सट्टा लावल्याप्रकारणी सहाजणांवर मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील यमगे येथे कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंचा सट्टा लावल्याप्रकारणी सहाजणांवर मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमगे गावच्या हद्दीत वडाचा माळा येथे कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार उघडकीस आला. या बेकायदेशीर झुंजी लावून त्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता. कोल्हापूर आणि मुरगूड पोलिसांनी छापा टाकला.
मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये झुंजी आयोजित केल्या प्रकरणी जितेंद्र उर्फ विकी सुरेश नायर कोल्हापूर, संदीप दिलीप लोंढे रा खडकेवाडा) या दोघा आयोजकांवर तर झुंजीसाठी कोंबडे आणणारे नासीर इसाक जमादार (रा. सोलापूर) साहिल झाकीर काझी (रा. जयसिंगपूर), सुरेशसुतार (मुदाळतिठ्ठा) व विशाल सुतार (रा. कोल्हापूर) या सहा जणांवर गुन्हा नोंद केला
अधिक माहिती अशी, यमगेच्या हद्दीत वडाचा माळ या ठिकाणी वेगवेगळ्या गाडीतून अनेक तरुण येत होते. सांगली, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांतून आलेले तरुण मोठ्या प्रमाणात होते. अनेकांनी आलिशान गाड्यातून अगदी दोन ते पाच फुटांपर्यंत उंच कोंबडे आणले होते. या कोंबड्यांच्या झुंजी लावून सट्टा लावला जात होता. प्रमुख आयोजक होते, ते विजयी कोंबडा मालकांना पाच ते दहा हजार बक्षीस देत होते.उपस्थितशौकीन यावर ठरावीक रक्कम सट्टा म्हणून लावत होते.
या झुंजीची माहिती सांगलीतील प्राणी मित्र अॅड. बसवराज हौसगोडर यांनी जिल्हा पोलिस व मुरगूड पोलिस यांना दिली. त्यानुसार दुपारी कोल्हापूर आणि मुरगूड पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला. अचानक आलेल्या पोलिसांना पाहून झुंजीच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. आयोजकांसह बघण्यासाठी व झुंजीवर सट्टा लावण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी गाड्या तिथेच टाकून रस्ता दिसेल तिकडे धावायला सुरुवात केली.