मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुनावणी पुन्हा लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या सुनावणीची नवी तारीख ही आता १६ एप्रिल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुका नंतरच होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. आता ही सुनावणी थेट १६ एप्रिलला होणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी ९ जानेवारीला होणार होती. त्यानंतर ही सुनावणी ४ मार्चला होणार होती. मात्र त्यापूर्वीच नवी संभाव्य तारीख समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणीची संभाव्य तारीख १६ एप्रिल दाखवण्यात आली आहे. यापूर्वीही काही वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, १६ एप्रिल पर्यंत लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक घोषित झालेले असेल आणि लोकसभा निवडणुकीचे काही टप्पे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाही. ही गुंतागुंत पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या नंतरच होतील अशी शक्यता आहे.