बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करणार , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती ; मुगळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बांधकाम कामगार महामंडळामध्ये आज रोजी १५ हजार कोटीहून अधिक रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यांच्यासाठी विविध योजना शासन राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच बांधकाम कामगारांना २३ भांड्याचा संच वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मुगळी ता. कागल येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मी प्रत्येक गावांमध्ये विकास कामे केली आहेत. त्याच गावची आकडेवारी जाहीर करतो. संपूर्ण विकास कामांची आकडेवारी जाहीर केली, तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. इतका प्रचंड निधी मी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत म्हणाले, ‘आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ हे एक आगळे वेगळे नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कायमपणे पाठबळ देणारा हा नेता आहे. म्हणूनच हे नेतृत्व असेच जोपासले पाहिजे.’ यावेळी उपसरपंच उदयबाबा पसारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत आनंदा पाटील यांनी केले. प्रास्ताविक माजी उपसरपंच बाबासाहेब सांगले यांनी केले. यावेळी माजी सरपंच पांडुरंग पसारे, कृष्णात गुरव, निवृत्ती पाटील, जयसिंग पाटील, मुकुंद पाटील, परशुराम शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.