लोकांच्या प्रतिसादामुळे कोल्हापूर दक्षिणमधून दोन लाख शेणी दान : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल मध्ये तसेच कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णाचे मृतदेह सुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यादा शेणी लागतात. या शेणी विकत विकत घ्यायचे म्हटले तरीसुद्धा जे शेणी पुरवठादार आहेत त्यांच्याकडून त्या प्रमाणात शेणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे, कोल्हापूर दक्षिणमधून लोकसहभागातून एक लाख शेणी पंचगंगा स्मशानभूमीसाठी देण्याचे नियोजन केले होते. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून कोल्हापूर दक्षिण मधून एक लाख ऐवजी दोन लाख शेणी देण्यात आल्या आहेत. यापैकी, पहिल्या टप्प्यात आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे दक्षिणमधील लोकसहभागातून जमलेल्या ८६ हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
दक्षिण मतदार संघातील ३५ गावांमधील पहिल्या टप्प्यात सांगवडेवाडी, नंदगाव, खेबवडे, गिरगांव, इस्पूर्ली, न्यू वाडदे वसाहत, पाचगांव, नेर्ली, द-याचे वडगांव, गांधीनगर , तामगांव, नागाव उजळाईवाडी या गावातील कार्यकर्ते ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनातून शेणी घेऊन आले होते. अवघ्या दोन दिवसात लोकांनी या शेणी दान देत कोरोना काळामध्ये आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहे.