कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पलटी होवून अपघात ; १५ प्रवासी जखमी

हातकणंगले तालुक्यातील टोप येथे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पलटी होवून अपघात झाला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (सोमवार) पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या विषयी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाणे, मुंबई येथून चंदगड कोल्हापूरच्या दिशेने एसटी बस येत होती. आज सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टोप येथील बिरदेव मंदिर समोरील वळणावर बस आली असता, यावेळी बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस ओढ्यावरील पुलाच्या संरक्षण कठड्याला घासत पुढे महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन पुढे पूर्वेकडील लोखंडी संरक्षक ग्रिल तोडून कच्च्या रस्त्यावर जाऊन उलटली.
यावेळी बस मधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अपघात झाल्यावर प्रवाशांनी आरडा ओरडा केला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.