निःस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्यांना पाठबळ देणे माझा राजधर्म : राजे समरजितसिंह घाटगे ; लाल मातीच्या सेवेचा केला सन्मान

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
छत्रपती शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे त्या काळात कुस्ती कलेने सुवर्णकाळ अनुभवला. त्यांच्या पश्चात अवकाळा आलेल्या कुस्ती कलेस स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दिलेल्या पाठबळामुळे चालना मिळाली. त्यांचा हाच विचार जयवंत पाटील यांनी आपल्या परीने जपून प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले आहे.लाल मातीच्या सेवेचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. निःस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना पाठबळ देणे हा माझा राजधर्मच आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले
उंचगाव ता.करवीर येथील बजरंग आखाड्याचे वस्ताद जयवंत पाटील यांनी राहत्या घरी बालमल्लांसाठी स्वखर्चातून आखाडा उभारून मोफत चालवित असल्याबद्दल त्यांच्या सत्कारवेळी ते बोलत होते. यावेळी प्रौढांच्या धावण्याच्या स्पर्धेतील यशाबद्दल त्यांच्या पत्नी सौ.अनिता पाटील यांचाही सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, खेळाडू,कलाकार यांच्यासाठी काम केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बजरंग आखाड्याच्या माध्यमातून बालमल्लांना मोफत कुस्तीचे धडे देऊन वस्ताद जयवंत पाटील यांनी चांगुलपणा जोपासला आहे.
वस्ताद जयवंत पाटील म्हणाले, आम्ही न बोलवता शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी आमचा घरी येऊन सत्कार केला त्यामुळे आम्हाला शाहू महाराज व स्व.विक्रमसिंहराजे यांचा आशीर्वादच मिळाला आहे.
उचगावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल उमेश पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील एन डी वाईंगडे, उमेश पाटील सतीश मर्दाने दादासो जाखले माणिक पाटील अजित पाटील उत्तम मोरे बी जी पाटील महेश चौगुले आनंदा माने अभिजीत पाटील आदी उपस्थित होते .स्वागत जयवंत पाटील यांनी केले आभार सुहास पाटील यांनी मानले.
गर्दीतील हिरे पारखण्याचे संस्कार स्व.राजेंचे…..
कोणत्याही निमंत्रणाशिवाय छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व स्व.विक्रमसिंहराजेंचे चिरंजीव समरजितसिंह घाटगे यांनी घरी येऊन सत्कार केल्याने आम्हाला बळ मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यावर श्री घाटगे यांनी गर्दीतील हिरे पारखून त्यांचा सन्मान करण्याचे संस्कार विक्रमसिंहराजेंनीच केल्याचे नम्रतापुर्वक उल्लेख केला.