भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा २४ जागांवर एकतर्फी विजय

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील यांच्या सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने 25 पैकी 24 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी संस्थापक कौलवकर आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
‘भोगावती’साठी रविवारी चुरशीने 86.33 टक्के मतदान झाले. सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी आघाडी, भाजप, शिवसेना, शेकापची शिवशाहू परिवर्तन आघाडी व संस्थापक कै. दादासाहेब पाटील आघाडी रिंगणात असल्याने भोगावती नदीकाठावरील गावांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. सत्तारूढ आघाडीचे सर्वच उमेदवार 500 ते 3,500 मताधिक्याने विजयी झाले.
राधानगरी तालुक्यातील कौलव गटातून उमेदवार राजाराम कवडे व धीरज डोंगळे, राशिवडे गटातून मानसिंग पाटील, अविनाश पाटील, कृष्णराव पाटील, प्रा. ए. डी. चौगले, कसबा तारळे गटातून अभिजित पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय हणमा पाटील, करवीर तालुक्यातील कुरुकली गटातून शिवाजी कारंडे, डी. आय. पाटील, केरबा भाऊ पाटील, पांडुरंग पाटील, सडोली खालसा गटातून रघुनाथ जाधव, अक्षय पवार पाटील, बी. ए. पाटील, प्रा. शिवाजी पाटील, हसूर दुमाला गटातून प्रा. सुनील खराडे व सरदार पाटील या सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांनी सहज विजय मिळवला.
सत्ताधारी आघाडीच्या महिला राखीव गटातील सीमा मारुती जाधव व रंजना दिनकर पाटील, अनुसूचित जाती गटातील दौलू कांबळे, इतर मागासवर्ग गटातील हिंदुराव चौगले आणि भटक्या विमुक्त जाती गटातील तानाजी काटकरही विजयी झाले. विरोधी कौलवकर आघाडीच्या धैर्यशील पाटील आणि सत्ताधारी आघाडीचे उमेदवार विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्यात रात्री उशिरापर्यंत काटाजोड लढत सुरू होती. अखेर धैर्यशील पाटील यांनीच बाजी मारली.
तत्पूर्वी, मतपत्रिका एकत्रीकरणानंतर सकाळी दहाच्या सुमारास प्रत्यक्षात मतमोजणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच सत्तारूढ आघाडीतील उमेदवार आघाडीवर होते. दुपारी 2 वाजेपर्यंत कौलव गटातील सत्तारूढ आघाडीचे धीरज डोंगळे व राजाराम कवडे, तर विरोधी आघाडीचे नेते धैर्यशील पाटील हे आघाडीवर, तर उदयसिंह पाटील-कौलवकर पिछाडीवर होते.
दुपारी 2 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार धैर्यशील पाटील 4,209, धीरज डोंगळे 4,170 तर राजू कवडे यांना 4,090 मते मिळाली होती. दुसर्या स्थानावर असलेल्या कौलवकर पॅनेल आणि सत्तारूढ आघाडीमध्ये सुमारे 1300 मतांचा फरक होता. मतमोजणी सुरू झाली तेव्हा 36 टेबलवर सर्व उमेदवारांची मतमोजणी होईल असा अंदाज होता. मात्र प्रत्येक गटनिहाय मतमोजणी सुरू झाल्याने ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होती. दुपारपर्यंत सुमारे 4 ते साडे चार हजार मते मोजली गेली. दुपारनंतर मतमोजणीला गती आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 11 हजार मतांची मोजणी झाली. तर रात्री 11 वाजेपर्यंत 20 हजार मतांची मोजणी झाली होती.