शाहू लोकरंग महोत्सवातून “लोककला”,” संस्कृतीचे ” जतन : राजे समरजितसिंह घाटगे ; झिम्मा-फुगडी स्पर्धेस महीलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, कोल्हापुरी साज-नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला झिम्मा-फुगडी, उखाणे, छुई-फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये दंग झाल्या होत्या. अक्षरशः महिलांच्या कलागुणांची चौफेर उधळणीत मराठमोळा सांस्कृतिक ठेवाच उपस्थितांनी अनुभवला.निमित्त होते कागल येथील जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे आयोजित केलेल्या शाहू लोकरंग महोत्सवाचे.
यावेळी महिलांनी दारुबंदी, गुटखा,लेक वाचवा- देश वाचवा,वृक्ष संवर्धन काळाची गरज यासह विविध विषयांवर प्रबोधनात्मक प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचे प्रात्यक्षिक महिलांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकातून उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी दिंडी चालली ज्ञानोबाची , वाट धरली पंढरीची,मला आवड भजनाची,वाट धरली पंढरीची या अध्यात्मिक भक्तीमय गाण्याने करून संपूर्ण भक्तीमय वातावरण निर्माण केले.
यावेळी शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, प्रविणराजे घाटगे,नंदितादेवी घाटगे, श्रेयादेवी घाटगे,शिवानीराजे घाटगे,म्रृगनयनराजे घाटगे,मोसमी आवाडे,अनघा ज्वेलर्स सौ व श्री कुणाल लडगे,सुजाता तोरस्कर, रेखाताई पाटील,विजया निंबाळकर उपस्थित होत्या. मराठी अभिनेत्री डॉ.भाग्यश्री शिंदे यांनी आपल्या अविट सुत्रसंचलनाच्या माध्यमातून कार्यक्रमात गोडवा निर्माण केला.
अन् बैलगाडीतून अवतरले शाहू राजे……..
व्हनुर येथील नंदिनी ग्रुपच्या महिलांनी सादर केलेली अदाकारी या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले.बैलगाडीतून
शाहूंच्या वेशात आलेली मनीषा संकपाळ ही तरुणी
या महिलेने हुबेहूब साकारलेली छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा, परिधान केलेले शाहूकालीन वस्त्रालंकार,उपस्थितांचे आकर्षण ठरले
समोर लेझीम -हलगीच्या तालावर महिलांनी धरलेला ठेका.जणू कांही या मंडळाने शाहूकालीन वातावरणच निर्माण केले होते.या सादरीकरणास खचाखच भरलेल्या शामियान्यातील मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत कौतुक केले .