एनडीएमध्ये बस्तवडेच्या सुपुत्राचा राष्ट्रपतींकडून गौरव ; हर्षवर्धन भोसले याला बेस्ट कँडीडेट म्हणून ब्रॉंझ पदक प्रदान!

मूळ बस्तवडे (ता. कागल) गावचा रहिवाशी पण सध्या पाचगाव येथे राहत असलेल्या हर्षवर्धन शैलेश भोसले याचा पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीए मध्ये बेस्ट कँडीडेट म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मान झाला आहे.बेस्ट कँडीडेट म्हणून पहिल्या तीन जणांमध्ये येत त्याने ब्रॉंझ पदक पटकावले आहे.
तीन वर्षांपूर्वी यूपीएससी मार्फत घेतलेल्या परीक्षेत देशातून त्याची तब्बल 8 लाख विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली होती.त्यावेळी देशात 107 वा क्रमांक पटकावत त्याने घरच्या व गावच्या लष्करी परंपरेला उजाळा दिला होता.
त्याचे 7 वी पर्यंतचे शिक्षण विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये झाले.त्यानंतर त्याने 7 वि मध्ये असताना राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) साठीची कठीण अशी प्रवेश परीक्षा दिली व विशेष म्हणजे या परीक्षेत या लष्करी कॉलेज साठी तो महाराष्ट्रामधून एकमेव पात्र ठरला होता.याच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज मध्ये एकीकडे 8 वी ते 12 वि शिक्षण व त्याचवेळी लष्करी पार्श्वभूमीचे काटेकोर प्रशिक्षण घेत त्याने युपीएससीची एनडीए परीक्षा दिली व त्यात तो चांगल्या गुणांनी पात्र ठरला होता.कै.कॅप्टन तुकाराम विष्णू भोसले,एअर मार्शल व भारतीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य अजित शंकरराव भोसले यांची घरची लष्करी परंपरा त्याने जपली आहे.तर प्रख्यात अवकाश संशोधक कै.आर.व्ही.भोसले यांचा तो पणतू आहे.
खडकवासला येथे तीन वर्षे त्याचे खडतर प्रशिक्षण झाले व गुरुवारी त्याची पासिंग आऊट परेड झाली.यावेळी त्याचा हा सन्मान झाला.या मध्ये त्याचे पूर्ण प्रशिक्षण,त्यातील वर्तन,अभ्यास,खेळ आदी बाबींच्या गुणांच्या आधारे ही निवड झाली. आता एक वर्षाचे विशेष प्रशिक्षण होईल व त्यानंतर तो सब लेफ्टनंट होईल.या सन्मान प्रसंगी वडील शैलेश,आई सीमा आदी उपस्थित होते.