40 हजारांची लाच स्वीकारताना कालवा निरीक्षकासह दोन जण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात ; एसीबीच्या कारवाईमुळे पाटबंधारे विभागात खळबळ

पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी 85 हजार रुपये लाचेची मागणी करुन 40 हजार रुपये लाच स्वीकारताना कालवा निरीक्षकासह दोन खासगी व्यक्तींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.25) दुपारी केली. अहमदनगर एसीबीच्या या कारवाईमुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली.
वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर कालवा निरीक्षक अंकुश सुभाष कडलग (वय-42 रा.बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर), खाजगी इसम अनिस सुलेमान शेख (वय- 34 रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), संजय भगवान करडे (वय-38 रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील 58 वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार यांचे सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर 3 मधील 319 एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण्यास घेतलेली आहे. तक्रारदार यांनी या क्षेत्रापैकी सध्या 60 एकर ऊस लागवड केली होती. शेतीला पाटबंधारे विभागाचे आवर्तना द्वारे पाणी मिळते. दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी पट्टी भरावी लागते. तक्रारदार यांना माहे जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीत रुपये 26 हजार 280 रुपये पाणीपट्टी आली होती. तक्रारदार हे पाणीपट्टी शेती महामंडळाचे हरेगाव येथील कार्यालयात भरतात. महामंडळातर्फे सदर पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते.
तक्रारदार यांचे 60 एकर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यापैकी 35 एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे सिंचन करतात. उर्वरित 25 एकर साठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतात. अंकुश कडलग यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगून पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी 85 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी अहमदनगर एसीबी कार्यालयात तक्रार केली.
प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 7 जून 2023 रोजी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी
दरम्यान अंकुश कडलग यांनी आरोपी अनिस शेख याचे मार्फत तक्रारदाराकडे पंचासमक्ष 85 हजार रुपये
लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच फोनवरील संभाषणाद्वारे दुजोरा दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि.25) अंकुश कडलग याने तक्रारदार यांच्या कडून पंचासमक्ष 40 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम आरोपी संजय करडे याचेकडे हस्तांतरित केली. एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे ,पोलीस निरीक्षक आर.बी. आल्हाट , पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,
सचिन सुद्रुक, पोहेकॉ दशरथ लाड यांच्या पथकाने केली.