मराठा बांधवांच्या मदतीसाठी मुंबईतील डबेवाले सरसावले ; मराठा बांधवांच्या जेवणाची सोय मुंबईतील डबेवाल्यांकडून करण्यात येणार

मुंबई :
राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठ्यांचं वादळ आता मुंबईच्या वेशीवर धडकलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येण्यावर ठाम आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा हा विराट मोर्चा मुंबईच्या वेशीवर अर्थात वाशीमध्ये पोहोचला आहे. तिथे आज सकाळी जरांगे पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी वाशीमध्ये पोहोचलं आहे.दरम्यान दुसरीकडे मराठा बांधवांच्या मदतीसाठी आता मुंबईतील डबेवाले सरसावले आहेत.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय मुंबईतील डबेवाल्यांकडून करण्यात येत आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. त्यांच्यासाठी मुंबईतील डबेवाले आता जेवणाची सोय करणार आहेत. मराठा बांधवांचा मोर्चा वाशीमध्ये पोहोचला आहे. वाशीमध्ये देखील डबेवाल्यांकडून आंदोलकांना जेवण पुरवलं जात आहे. डबेवाले कामावर जातात सोबत एक नव्हे तर दोन डबे घेऊनच बाहेर पडत आहेत. एक डबा मी खाईल आणी एक डबा जेथे भुकेला मराठा आंदोलक दिसेल तेथे त्याला डबा खाऊ घालणार अशी भावना या डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा काढता आला नाही. त्यामुळे 24 डिसेंबरच्या एक दिवस आधीच 23 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली होती. या सभेमध्येच त्यांनी 20 जानेवारीला अंतरवालीसराठीमधून मुंबईच्या दिशेन निघणार असल्याची घोषणा केली होती.आता हा मोर्चा वाशीमध्ये पोहोचला आहे. वाशीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहे.