पन्हाळा : कळेसह धामणी खोऱ्यात श्रीराम प्रतिष्ठापना भक्तिमय व राममय वातावरणात संपन्न

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील कळे सह परिसरातील अनेक गावांमध्ये अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर व प्राणप्रतिष्ठापणा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त अयोध्येप्रमाणे देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय.याच औचित्य साधून शहरासह ग्रामीण भागात आज ठिकठिकाणी राममय वातावरण दिसून येत होते.
कळेसह धामणीखोऱ्यातील विविध गावांमध्ये घराघरात भक्तिमय व चैतन्यमय वातावरण होते.प्रत्येक घरासमोर स्वच्छता करण्यात येऊन रांगोळी काढली होती.गावागावातील ग्रामदैवत मंदिरांची स्वच्छता करुन सजावट केली होती.
आजचा उत्सव म्हणजे प्रत्येकांसाठी एक सणच होता म्हणून घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. दारात गुढी किंवा भगवी पताका फडकवण्यात आली होती.आरती, भजन, कीर्तन, प्रवचन यामुळे संपूर्ण परिसरात वातावरण प्रभु श्रीरामांच्या रामजपाने भक्तिमय झाले होते.तसेच अनेक ठिकाणी श्री रामांची पालखीतुन मिरवणूक,ठिकठिकाणी श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना शुभेच्छा देणारे डिजीटल लावण्यात आले होते.
सावर्डे येथील ज्योतिर्लिंग मंदिरातील पुजारी वसंत गुरव व त्यांच्या मुलांनी मिळून श्री जोतिबाची श्रीराम रुपात पुजा बांधून श्रीराम सेतू व राममहिमा दर्शविणारा अतिशय सुंदर देखावा तयार केला होता. त्यामुळे हा देखावा व सजावट पाहण्यासाठी मंदिरात रामभक्तांची एकच गर्दी झाली होती.वाघुर्डे येथे गावातील सर्व ज्येष्ठ रामभक्तांनी श्री हनुमान मंदिरात श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करुन भक्तिमय वातावरणात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद घेतला.
मल्हारपेठ येथील हनुमान मंदिरात मोठ्या स्क्रीनवर अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा लाईव्ह दाखवण्यात येऊन भजन, कीर्तन व रामलल्लांचा जप सुरू होता. कळे येथील दक्षिणाभिमुख मारुती मंदिरात सर्व स्त्रि भक्तांनी एकत्र येत एक दिवसीय पारायण भरवत श्रीरामांचा अखंड जप सुरू ठेवला होता.तसेच कळेतील रामभक्तांकडून कळे बाजारभोगाव रोडवर प्रवाशांना लाडुचा प्रसाद वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे कळेसह परिसरातील अनेक रामभक्तांकडून चैतन्यमय वातावरणात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.