5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अॅन्टी करप्शनकडून अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करु नये व तपासात मदत करण्यासाठी लाच घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने चक्क एका वकिलाला मध्यस्थी करायला सांगितले. अशी मध्यस्थी करणे वकिलाला महागात पडले असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना वकिलासह पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय ३५, रा. परमारनगर शासकीय पोलीस क्वॉटर, वानवडी) आणि अॅड. राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१, रा. चित्रदुर्ग अपार्टमेंट, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ३४ वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार याच्या भावाविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण याच्याकडे त्याचा तपास आहे. तक्रारदार याच्या भावाला अटक न करणे व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी चव्हाण याने तक्रारदार याला ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी केली.
त्यात चव्हाण यांनी राहुल फुलसुंदर याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे राहुल फुलसुंदर याने तडजोडी अंती ४० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार पोलिसांनी डहाणुकर कॉलनी पोलीस चौकीजवळ सापळा रचला. तक्रारदार याच्याकडून ४० हजार रुपये स्वीकारताना फुलसुंदर याला रंगेहाथ पकडण्यात आले. पाठोपाठ गणेश चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. गणेश चव्हाण याच्या घरी झडतीही रात्री घेण्यात आली. दोघांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस शिपाई तावरे, डावखर, कदम यांनी ही कारवाई केली.