कागलमध्ये सौ. संगीता पाटील -कुलकर्णी यांच्या अभंगरंगच्या भक्तीरसात रसिक चिंब ; नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलमध्ये गैबी चौकात आयोजित केलेल्या पुणेच्या सौ. संगीता पाटील -कुलकर्णी यांच्या अभंगरंग कार्यक्रमाच्या भक्तीरसात रसिक अक्षरशः चिंब झाले. त्यांच्या शास्त्रीय पद्धतीच्या गायनाला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने गर्दीचा उच्चांक गाठला.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने गैबी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सौ. पाटील -कुलकर्णी यांच्यासह सर्वच सहकलाकारांचा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला.
तब्बल तीन तास भक्तीरसात रंगलेल्या या कार्यक्रमात सौ. पाटील -कुलकर्णी यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी’ या पंचपदीने “अभंगरंग” या शास्त्रीय संगीत भजनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात त्यांनी श्री. विठ्ठल, श्रीराम, रामदास स्वामी यांचे अभंग गायिले. ‘काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग’, ‘आधी रचिली पंढरी’, ‘अवघे गरजे पंढरपुर’, ‘अबीर गुलाल उधळत रंग’ या अभंगांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तसेच कार्यक्रमात ‘श्रीरंगा कमला कांता’ ही गवळणही गायली. सौ. पाटील – कुलकर्णी यांनी भैरवी रागामध्ये ‘उलट्या नामे तरला वाल्या -धन्य प्रभूचे नाम’ या अभंगांने अभंगरंग कार्यक्रमाची सांगता केली.
“बंदीशीला दाद…….!”
उपस्थित रसिक श्रोत्यांनी बंदीशीची फर्माईश केल्यानंतर सौ. पाटील- कुलकर्णी यांनी सोहनी रागातील तराना गायिला. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.
अभंगरंग कार्यक्रमात सहभागी झालेले सहकलाकार असे, हार्मोनियम- अभिनय रवांदे, तबला साथ- प्रशांत पांडव, पखवाज साथ- प्रथमेश तारळेकर, साईड रिदम -यश खाडे, बासरी साथ – एस. आकाश, निवेदन किर्तनचंद्र ह. भ. प श्रेयस बडवेमहाराज.



