कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे गर्भपात केंद्र चालवणा-या बोगस डॉक्टरला पोलिस कोठडी

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्र चालवणा-या रॅकेटचा सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील याला करवीर पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मुलगा होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणा-या टोळीचा आरोग्य विभाग व पोलिसांनी भांडाफोड केला. क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमधील अमित केरबा डोंगरे (वय ३३) याच्या घरात मंगळवारी (दि. १६) छापा टाकून पथकाने तिघांवर गुन्हा दाखल केला.
टेक्निशियन अमित डोंगरे आणि एजंट कृष्णात जासूद यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, रॅकेटचा मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील पसार झाला होता. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी त्याला अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. अटकेतील तिन्ही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. संशयितांनी गेल्या दीड वर्षात अनेक महिलांचा गर्भपात करून त्याचे पुरावे नष्ट केले आहेत. सोनोग्राफी मशीनमधील डेटाही त्यांनी वेळोवेळी डिलिट केला.
त्यांच्या मोबाइलमध्ये काही संदर्भ मिळत आहेत. तिन्ही संशयितांची बँक खातीही तपासली जाणार आहेत. त्यांच्या खात्यावर आलेल्या पैशांची माहिती घेऊन चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पाटील याने गर्भलिंग निदान करण्यासाठी जुने सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. सोनोग्राफी मशीनच्या खरेदी-विक्रीवर अनेक निर्बंध असतानाही त्याला मशीन कोणाकडून मिळाले, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.