ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमआयडीसीतील उद्योजक,कंपन्या व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर : राजे समरजितसिंह घाटगे ; पगारवाढीच्या कराराबद्दल इंडो काऊंटच्या कर्मचाऱ्यांनी केला सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

औद्योगिक वसाहतीतील कामगार व उद्योजक-कंपन्या यांना कोणतीही अडचण आल्यास आपण त्यामध्ये लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडाण्यासा सदैव तत्पर राहणार आहे.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

गोकुळ शिरगाव ता करवीर येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने आयोजित सत्कारवेळी ते बोलत होते. इंडो काउंट कंपनी प्रशासन व कर्मचारी यांच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी करून कामगारांचा पगारवाढीचा करार यशस्वीपणे केल्याबद्दल व कंपनी सुरळीतपणे चालू केल्याबद्दल श्री घाटगे यांचा कामगारांच्या वतीने जाहीर सत्कार केला. यावेळी या कामी सहकार्य केलेल्या इतर मान्यवरांचाही कामगारांच्या वतीने सत्कार केला. इंडोकाउंटच्या कामगारांच्या प्रश्नावर यशस्वी तोडग्यासाठी गेल्या तीन वर्षापासून अनवाणी राहण्याचा पण केलेल्या बाळासाहेब पाटील या कर्मचाऱ्यांचा यावेळी श्री घाटगे यांच्या हस्ते विशेष सत्कार केला.

यावेळी टेस्सीटूरा मॉन्टी इंडिया लि., एफ एम हेमेरले टेक्स्टटाईल, मार्वलस मेटलस् या कंपनीतील प्रतिनिधींनी कामगारांचे प्रलंबित प्रश्नांबाबत श्री घाटगे यांची भेट घेऊन इंडोकाउंटप्रमाणे यशस्वीपणे मध्यस्थी करणेबाबत साकडे घातले.

श्री घाटगे पुढे म्हणाले, कंपनी प्रशासन व कामगारांत समन्वय ठेवून दोन्ही घटकांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. सहकारमहर्षी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी तसे आमच्यावर संस्कार केले आहेत .कर्मचाऱ्यांनी एकीने राहून कंपनीच्या भरभराटीसाठी योगदान द्यावे.

अॕड आर डी पाटील म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहतीतील सर्वच कामगारांच्या मदतीसाठी कामगार हेल्पलाइन सुरू करणार आहोत. त्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू.

यावेळी जयवंत रावण, आर डी पाटील, भरत पाटील, लक्ष्मण हराळे, दत्तात्रय पाटील,किरण साळुंखे भिकाजी भोसले यांच्यासह युनियन व कर्मचारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत संतोष जाधव यांनी केले. आभार नामदेव भोसले यांनी मानले.

राजेंच्यामुळे ७३०चुली विझण्यापासून वाचल्या…

इंडो काउंट कंपनीच्या प्रशासन व कामगारांमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता यशस्वीपणे शिष्टाई केली. त्यामुळे या कंपनीतील कामगारांच्या विझणाऱ्या चुली पेटत्या राहिल्या.घाटगे यांनी मध्यस्थी केली नसती तर या कामगारांच्या चुली विझल्या असत्या.राजेंच्यामुळे ७३० जणांच्या चुली विझाण्यापासून वाचल्या .या कामगारांचा आशीर्वाद येत्या काळात घाटगे यांना नक्की मिळेल. असे प्रतिपादन उद्योजक जयवंत रावण यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks