सांगाव येथील धरणग्रस्त नागरिकांचा प्रॉपर्टी कार्ड व सात बारा चा प्रश्न मार्गी ; महसूल मंत्री विखे पाटील यांची राजे समरजीत सिंह घाटगे यांनी घेतली भेट

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कसबा सांगाव ता. कागल येथील येथील धरणग्रस्तांच्या वाकी व वाडदे वसाहतीतील नागरिकांचा बरीच वर्षे प्रलंबित असलेला प्रॉपर्टी कार्ड व सात बारा चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
नुकतीच त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. व धरणग्रस्तांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा केली. याबाबत लवकरच निर्णय घेवून हा प्रश्न मार्गी लावू असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची धरणग्रस्तांसमवेत दिनांक 28 मार्च व 19 मे रोजी संयुक्त बैठक ही झाली होती. या बैठकीत ठरल्यानुसार श्री घाटगे यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रतिनिधिक स्वरूपात वाकी व वाडदे वसाहतीत दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी प्रत्यक्ष जाऊन या समस्यांबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकले होते व समस्यांची पाहणीही केली होती.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता हा प्रॉपर्टी कार्डचा व सात बाराचा बरीच वर्षे रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.याबद्द्ल धरणग्रस्त नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.