मुरगुड येथे श्रीरामांच्या अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आयोध्या येथून मुरगूड शहरांमध्ये आलेल्या श्रीरामांच्या अक्षता कलशांची भव्य शोभायात्रा आज अभूतपूर्व उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडली . २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत श्री रामचंद्रांची मूर्तीप्रतिष्ठापणा होत आहे.
मुरगुड नाका नंबर एक पासून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर रथातून कलशांची मिरवणूक सुरू झाली.यावेळी रामनामाच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये मुलींचे लेझिम पथक, टाळ मृदुंग वाद्य वृंद, रणमर्द आखाड्यातील मुलांची रोमांचक प्रात्यक्षिके यांच्या गजगजाने या शोभायात्रेची भव्यता वाढवली.
मिरवणुकीत शेकडो अबालवृद्ध रामभक्तांनी भाग घेतला होता.सुवासिनींनी कलश धारकांच्या पायावर पाणी घातले.मिरवणूक मार्गावर घरा घरावर भगवे ध्वज लावण्यात आले होते व आकर्षक रांगोळी प्रत्येक घरासमोर रेखाटली होती.अशा भक्तिमय उत्साही वातावरणात मिरवणूक गावातील राम मंदिर व तेथून ग्राम दैवत अंबाबाई मंदिरात आली.कलश देवीसमोर ठेवण्यात आले .तेथे विधिवत पूजा व सामुदायिक आरती करण्यात आली.
हे कलश गावातील विठ्ठल मंदिर,गणेश मंदिर ,हनुमान मंदिर येथेही ठेवण्यात येणार आहेत.या निमंत्रण अक्षता एक जानेवारी पासून घरोघरी वाटण्यात येतील.तसेच २२ जानेवारीला घरोघरी देव्हाऱ्यात राममूर्तीची पूजा अर्चा करून दीप लावण्यात यावेत व दीपावली सारखा सण साजरा करावा असे आवाहन न्यास व्यवस्थापनाने केले आहे.
न्यासाच्या वतीने प्रकाश पारिश्र्वड,तानाजी भराडे,सोमनाथ यरनाळकर ,सुखदेव येरुड कर (माजी नगराध्यक्ष), सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, जगदिश गुरव,उमेश कुलकर्णी,मयूर सावर्डेकर,संकेत भोसले,डॉ.संजय वडेर ,सुहास खराडे ,जयसिंग भोसले,अमर चौगले, अनुबोध गाडगीळ इत्यादी अनेकांनी आपला सहभाग नोंदवला