सिद्धनेर्लीतील पूरग्रस्तांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता ; ३५ वर्षानंतर मिळाली स्वहक्काच्या घराची मालकीपत्रे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सिद्धनेर्ली ता. कागल येथील शंभरहून अधिक पूरग्रस्त कुटुंबीयांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तब्बल ३४ वर्षानंतर त्यांना नदीकिनाऱ्यावरील घराच्या जागेची स्वहक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत. याबद्दल मातंग व चर्मकार समाजाच्या पूरग्रस्त कुटुंबीयांनी ढोल, कैताळ आणि हालगीच्या निनादात एकत्र येऊन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार केला.
याबाबत अधिक माहिती अशी, सिद्धनेर्ली गावाच्या दक्षिणेकडील बाजूला मातंग समाज आणि चर्मकार समाजातील घरे होती. दूधगंगेला पूर आल्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात नदीचे पाणी या दोन्ही गल्ल्यांमधील घरांमध्ये शिरायचे. म्हणून १९८९ शंभरहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना नदीकिनाऱ्यावरील गट नंबर ७७ मधील सरकारी सरकारी जागा घर बांधण्यासाठी दिली होती. या जागांवर घरे बांधून पूरग्रस्त कुटुंबीय वास्तव्यासही होते. परंतु; त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या सनदा तयार झाल्या नव्हत्या. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून शासन दरबारी हा विषय लावून धरला. अखेर ३५ वर्षानंतर या पूरग्रस्तांना स्वहक्काच्या मालकीची कागदपत्रे मिळाली. श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सर्व पूरग्रस्तांना त्यांच्या स्वहक्काच्या मालकीच्या सनदांचे वाटप यावेळी झाले. त्यामुळे; या पूरग्रस्त कुटुंबीयांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी सरपंच दत्ता पाटील, कागल तालुका खरेदी -विक्री सहकारी संघाचे संचालक कृष्णात मेटील, दिलीप साठे, साताप्पा साठे, योगेश साठे, सौरभ साठे, सागर माने, राहुल माने, रविदास माने, संभाजी सातपुते, नागेश माने आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आनंद पोटात माईना…..!”
राहत्या घरामध्ये दूधगंगा नदीचे पाणी शिरायचे, ही गोष्ट खरीच आहे. वाड-वडिलांच्या आठवणी हृदयात घेऊन जड अंतकरणाने राहती घरे सोडली. सरकारने जागा दिलेल्या प्लॉटवर नदीकिनाऱ्यावर नवीन घरे बांधून राहायला आलो. परंतु; या घरांच्या जागाच नावावर होत नव्हत्या. आज स्वहक्काच्या मालकीची कागदपत्रे बघून “आनंद पोटात माईना…” अशा प्रतिक्रिया पूरग्रस्त कुटुंबातील माता-भगिनींनी व्यक्त केल्या.