लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलच्या दादासो लवटे यांची भारतीय कुस्ती संघ प्रमुख प्रशिक्षकपदी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
किर्गिस्थान येथे होणाऱ्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे यांची निवड करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी नजफगड (दिल्ली) या ठिकाणी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संघटना आयोजित लेवल १ कोर्स उत्तीर्ण केल्यामुळे ही निवड झाली. स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंना ते मार्गदर्शन करणार आहेत. दादासो लवटे हे मुरगूड येथे २०१० पासून मंडलिक कुस्ती संकुलचे कोच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई, जागतिक, रँकिंग सिरीज अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून स्वाती शिंदे, नंदिनी साळुंखे, अमृता पुजारी, तन्वी मगदूम, नेहा चौगले यांनी पदके प्राप्त केली आहेत तर स्वाती शिंदे ही २०२३ ची व नंदिनी साळोखे २०२४ ची शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुस्तीगीर आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीनशेहून अधिक पदके महिला व पुरुष कुस्तीगीरांनी मिळवली आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंग, सेक्रेटरी विनोद तोमर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके व कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी लवटे यांची निवड केली. लवटे यांना माजी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, सह-आयुक्त (प्रशासन) राज्य उत्पादन शुल्क सुनील चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, डॉ. प्रशांत अथणी यांचे प्रोत्साहन लाभले.