10 हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक पोलीस फौजदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

दखलपात्र गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजार रुपये लाच स्वीकारताना शिरुर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार राजेंद्र दगडू गवारे (वय-53) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.20) शिरुर येथील तहसील कचेरीच्या समोरील एका हॉटेलमध्ये केली.
याबाबत 65 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. तक्रारदार व त्यांचे मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजेंद्र गवारे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे सहायक पोलीस फौजदार राजेंद्र गवारे 50 हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आज (दि. 20 बुधवार) केलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी राजेंद्र गवारे यांनी 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोड़ी अंती 10 हजार रुपये गवारे यांनी लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. पथकाने तहसीलदार कचेरी कार्यालयासमोरील हॉटेल मित्रधन येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना राजेंद्र गवारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव , पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर ,पोलीस शिपाई प्रवीण तावरे, पोलीस शिपाई आशिष डावकर, चालक पोलीस हवालदार काकडे यांच्या पथकाने केली.