बिद्री कारखान्याच्या अध्यक्षपदी के.पी.पाटील, उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटे

बिद्री प्रतिनिधी :
बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार के. पी. पाटील ( मुधाळ ) यांची पाचव्यांदा निवड झाली. तर उपाध्यक्षपदी गणपतराव गुंडू फराकटे ( बोरवडे ) यांची निवड करण्यात आली. विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. निवडीनंतर नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
बिद्री साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक आज सकाळी दहा वाजता कारखाना प्रधान कार्यालयात बोलाविण्यात आली होती.
अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची निवड निश्चित होती. तर उपाध्यक्षपदाचे नाव असलेले बंद पाकीट केडीसीसीचे संचालक भैय्या माने, गोकूळचे संचालक नविद मुश्रीफ हे सभास्थळी घेऊन आले. यामध्ये उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फराकटे यांचे नाव नेत्यांनी सुचवले. याला उपस्थित संचालकांनी एकमताने मंजुरी दिल्याने फराकटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी के. पी. पाटील यांचे नाव संचालक राजेंद्र पाटील यांनी सुचवले. त्याला संभाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फराकटे यांचे नाव संचालक पंडीत केणे यांनी सुचवले. त्याला डी. एस. पाटील यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, चार तालुक्यांतील सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून देत आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नुतन संचालक मंडळ व प्रशासनाच्या सहकार्यावर उस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देवून त्यांच्या विश्वासाला जपण्याचे काम केले जाईल. कारखाना सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून भविष्यात विकासाच्या नवनवीन योजना कारखान्यात राबविण्याचा आपला मानस आहे.
यावेळी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, संचालक राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, उमेश भोईटे, डी. एस. पाटील, दिपक किल्लेदार, सुनील सुर्यवंशी, रणजित मुडुकशिवाले, प्रविणसिंह पाटील, रंगराव पाटील, रवींद्र पाटील, मधुकर देसाई, राहुल देसाई, पंडित केणे, धनाजी देसाई, सत्यजित जाधव, केरबा पाटील, संभाजी पाटील, रंजना पाटील, क्रांती ऊर्फ अरुंधती पाटील, रामचंद्र कांबळे, फिरोजखान पाटील,रावसाहेब खिल्लारी, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, चीफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
व्याही-व्याही झाले अध्यक्ष, उपाध्यक्ष……
नुतन अध्यक्ष के. पी. पाटील व उपाध्यक्ष गणपतराव फराकटे हे नात्याने एकमेकांचे व्याही आहेत. गणपतराव फराकटे यांची कन्या माधुरी ही के. पी. यांची स्नुषा तर त्यांचे सुपुत्र, गोकूळ व केडीसीसीचे संचालक रणजीत पाटील यांच्या पत्नी होत. यापुर्वी २००५ साली के. पी. पाटील हे अध्यक्ष असताना गणपतराव फराकटे हे उपाध्यक्ष झाले होते. मात्र ते एकमेकांचे व्याही नव्हते. आजच्या निवडीने कारखान्याच्या इतिहासात व्याही-व्याही अध्यक्ष, उपाध्यक्ष होण्याचा दुर्मिळ योगायोग जुळून आला.