कोल्हापूर : सीसीटीव्ही च्या वायरी कापून धान्य दुकानात चोरी

लक्ष्मीपुरी धान्य लाईन परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम दोन लाख रुपये लंपास केली .ही चोरी करण्यापूर्वी चोरट्याने सीसीटीव्हीच्या वायरी कापल्या होत्या, त्यामुळे माहितगार चोरट्यांनीच हा डल्ला मारला असावा असा संशय व्यक्त केला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्याचे काम सुरू आहे.
लक्ष्मीपुरी धान्य लाईन या ठिकाणी महादेव चिवटे आणि निळकंठ सावर्डेकर यांची धान्य दुकान आहेत. शुक्रवारी रात्री चोरट्यानी छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील तिजोरी उघडता आली नसल्यामुळे ड्रॉवरमध्ये असणारे पंचवीस हजार रुपये चोरले. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या निळकंठ सावर्डेकर यांच्या दुकानाचाही पत्रा उचकटून आत प्रवेश केला .दुकानातील जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली.
शनिवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला त्यानंतर व्यापाऱ्यानी लक्ष्मीपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली व पंचनामा केला. चोरट्याचा माग काढण्यासाठी डॉग पथकाला पाचारण केले होते, मात्र हे श्वान याच परिसरात घुटमळले ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यानी या परिसरातील सीसीटीव्हीच्या सर्व वायरी कापल्या होत्या, त्यामुळे परिसरातील एकही दुकानात चोरट्यांचे फुटेज सापडले नाही.