बस्तवडेत ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू

बस्तवडे (ता.कागल) येथे स्वतःच चालवत असलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना (शुक्रवार) रात्री घडली आहे. अजय यशवंत राठोड (वय -23) रा.विजापूर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, राठोड हा एकोंडी (ता.कागल) येथील निवास आनंदा चव्हाण यांच्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. घोरपडे कारखान्यास ऊस पाठवून रिकामा ट्रॅक्टर (क्रमांक MH10-AY-9535) ट्रॉली व छकडीसह घेऊन तो एकोंडीकडे भरधाव वेगाने चालला होता. बस्तवडे फाटा ते आणूर रस्त्यावर अंबिका गारमेंट जवळ त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला जाणाऱ्या ट्रॅक्टर मधून त्याने उडी मारली.
यावेळी त्याचे चप्पल गिअरच्या दांडक्यात अडकून तो खाली पडला व त्याच्या अंगावरून मोठे चाक पोट व कमरेवरून गेले. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. मुरगुड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल कुंभार व जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला. मुरगुड येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.