वीरकुमार पाटील यांच्यामुळेच तरुण चेहऱ्याला संधी : लक्ष्मी हेब्बाळकर बेळगाव विधान परिषद निवडणुकीची कोगनोळीमध्ये प्रचार सभा

कोगनोळी :
बेळगाव विधान परिषद जागेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी तरुण चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला व त्यामुळेच चन्नराज हट्टीहोळी यांना काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली. इथून पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू. त्यासाठी मतदारांनी मत रुपी आशीर्वाद द्यावेत व चन्नराज हट्टीहोळी यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कोगनोळी येथे आयोजित काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चन्नराज बसवराज हट्टीहोळी यांच्या प्रचार सभेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील हे होते.
स्वागत व प्रास्ताविक के डी पाटील यांनी केले. काँग्रेस पक्षाने 28 वर्षे विधानसभा व विधान परिषदेत काम करण्याची मला संधी दिली. पक्षाशी एकनिष्ठ असण्याचे फळ प्रत्येकाला मिळतेच. त्यामुळे मतदारांनी पक्षनिष्ठेवर विश्वास ठेवून अधिकृत उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी यावेळी केले. भाजप हा लोकशाहीच्या विरोधातील पक्ष आहे. काळम्मावाडीचे चार टीएमसी पाणी आणण्याबरोबरच इतर झालेला शाश्वत विकास हा सर्व काँग्रेस शासनाच्या काळातच झालेला आहे. असे प्रतिपादन काकासाहेब पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील आदींनी मनोगतातून हट्टीहोळी यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी जयवंत कांबळे, बसवराज पाटील, रोहन साळवे, मृणाल हेब्बाळकर, यांच्यासह कोगनोळी, सौंदलगा, आप्पाचीवाडी, कुरली ग्रामपंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कदम तर आभार बाळू पाटील यांनी मानले.