कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात दोन विद्यार्थिनी जखमी; आजरा तालु्क्यातील सोहाळे येथील घटना

आजरा :
गव्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर हल्ला केल्याची घटना आजरा तालु्नयातील सोहाळे येथे शुक्रवारी (दि. 25) दुपारी घडली. यामध्ये शर्वरी सुनील कोंडूसकर (रा. बाची) आणि कु. सानिका मारुती कोंडूस्कर, ( वय 18) रा. बाची या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. सोहाळे परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वन्यप्राण्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शर्वरी सुनील कोंडूसकर, स्नेहल सतीश कोंडूसकर व सानिका मारुती कोंडूस्कर या मुली कॉलेज करुन सोहाळे, बाची या गावी येत होत्या. दरम्यान सोहाळे फाट्यावरुन गावात चालत येत असताना मारुती कळेकर व बाळासाहेब दोरुगडे यांच्या रांगी नावाच्या शेताजवळ गव्याने अचानक हल्ला केला. यामध्ये शर्वरीला गव्याने धक्का दिला त्यामध्ये ती रस्त्यावर कोसळून तीला मार बसला. तसेच कु. सानिका कोंडूस्कर तिच्यावर देखील गव्याने हल्ला केल्यामुळे ती जखमी झाली. हल्ला करुन गवा जंगलाच्या दिशेने निघून गेला.
रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तातडीने शर्वरी आणि सानिका हीला उपचाराकरिता आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वनविभाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेवून जखमींची विचारपूस करण्यात आली. सोहाळे परिसरात वन्यप्राण्यांची दहशत वाढली असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी हल्ला :
गुरुवारी गावाच्या सीमेवर कोल्ह्याने हल्ला करुन गावातील दोघांना जखमी केले आहे. पाठपोठ शुक्रवारी गव्याने महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.