मोठी बातमी : मॉन्सून आता वेग पकडणार; मुंबईसह महाराष्ट्रात लवकरच बरसण्याचा अंदाज

मॉन्सून यंदा देशात उशीराने दाखल झाला असून त्याचा प्रवासही संथ गतीने सुरू आहे. देशात काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थानात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून कोकण किनारपट्टीच्या भागात रखडला होता. आता तो वेग पकडणार असून आठवड्याभरात मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
मॉन्सूनला विलंब झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थानात उकाड्याने जनता त्रस्त आहे. तसेच मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाडा अधिकच जाणवत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात उष्णतेची लाट आहे. आतापर्यंत मॉन्सून महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तराखंडपर्यंत पोहचायला हवा होता. मात्र, तो कोकण किनारपट्टीच्या भागातच रखडला आहे.
आता मॉन्सून वेग घेणार असून आठवड्याभरात मॉन्सून मुंबईसह महाराष्ट्रात बरसणार आहे. 26 तारखेपासून मॉन्सून मुंबई आणि महाराष्ट्र व्यापून त्याच्या पुढील प्रवासाला अनुकूल वातावरण तयार होत आहे. ओदिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलगंणामध्ये 80 ते 90 टक्के पाऊस कमी झाला आहे. आता आठवड्याभरात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याने उकाड्याची तीव्रताही कमी होणार आहे.