शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्राच्या वारीची परंपरा राज्यातील सर्वांनाच माहिती आहे. दरवर्षी लाखोंहून अधिक वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात. यंदा आषाढी एकादशी ही 29 जूनला आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.
अशातच राज्यातील लाखो वारकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. हा विमा वारीच्या कालावधीत म्हणजेच 30 दिवसांसाठी असणार आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल.
जर वारीमध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये देण्यात येणार आहे. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे. दिंडी सोहळ्यादरम्यान अपघात किंवा दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.