ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन ; अस्सल विनोदाचा धडाका हरपला

हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, गंमत जंमत, सिंघम अशा सुपरहिट चित्रपटात आपल्या अभिनयाने ठसा उमटविणारे मराठी चित्रपटसृष्टी गाजवणार्या चरित्र कलावंतांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्यांना अचानक ह्दयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रवींद्र हे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्याबरोबर त्यांनी बर्याच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
रवींद्र बेर्डे यांची वयाच्या विसाव्या वर्षीच आकाशवाणी व नाट्यसृष्टीशी नाळ जुळली. त्यांनी सुरुवातीच्या काळात ३१ नाटकांमधून भूमिका केल्या. सुरुवातीला खलनायकी व्यक्तीरेखा रंगविल्यानंतर त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी विनोदी भूमिका मिळू लागल्या.मालिका, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केले होते.
हमाल दे धमाल, थरथराट, चंगू मंगू, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भूताची शाळा, खतरनाक, उचला रे उचला, बकाल, होऊन जाऊ दे असे मराठी तसेच सिंघम अशा सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. जवळपास ३०० हून अधिक मराठी व ५ हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते.
२०११ पासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यातच मध्यरात्री त्यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.