केडीसीसी बँकेची पगारदारांना ३० लाखांची अपघाती विमासुरक्षा ; नोकरदारांना पगाराची खाती असलेल्या शाखांशी संपर्क साधण्याचे केले आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे खातेदार असलेल्या सर्वच पगारदार – नोकरदारांना बँकेने ३० लाख रुपयांची अपघाती विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. राष्ट्रीयकृत कंपनी असलेल्या न्यू इंडिया ऍशूरन्स कंपनीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या सहयोगातून पुणेच्या ईमेड लाईफ इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विस या कंपनीच्या माध्यमातून बँकेने अवघ्या ४७२ रुपयांच्या हप्त्यात ही योजना सुरु केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नोकरदारांनी ते पगार घेत असलेल्या संबंधित शाखांशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरण्याचे आवाहन बँक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बचत खाती असलेल्या विविध नोकरदार आणि पगारदार संघटनांनी बँकेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात अशा विमा सुरक्षा योजनेची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करीत बँकेने २० हजार पगारदारांच्या सुरक्षेसाठी ही योजना सुरू केली आहे. शासकीय, निमशासकीय नोकरदार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बँकेचे सर्व सेवक, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, साखर कारखान्याचे कामगार, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, केडरचे सचिव, विकास सेवा संस्था, दूध संस्था व पतसंस्था यांचा समावेश आहे. विमा हप्ता भरल्यापासून एक वर्ष या विमा सुरक्षा कवचाची मुदत आहे.
हप्ता ४७२ चा, सुरक्षा ३० लाखांची……….!
या योजनेत समाविष्ट विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अगर कायमचे अपंगत्व आल्यास ३० लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. विमाधारकाचे दोन हात किंवा दोन डोळे किंवा दोन पाय कायमचे निकामी होऊन अपंगत्व आल्यास शंभर टक्के सुरक्षा मिळणार आहे. एक अवयव निकामी झाल्यास अगर ५० टक्के अपंगत्व आल्यास १५ लाख रुपये विमा भरपाई मिळणार आहे. अवघ्या ४७२ रुपयांच्या हप्त्यामध्ये बँक आणि विमा कंपनीने नोकरदार पगारदारांची ही जोखीम घेतलेली आहे.