कामगार विभागाच्या उपसंचालक मागतात ३० टक्के कमिशन ; अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केलेल्या बिलाची टक्केवारी म्हणून १७ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कामगार विभागाच्या उपसंचालकाला रंगेहाथ पकडले.
नंदकिशोर आबासाहेब देशमुख (वय ४५, रा. विंडवड्स सोसायटी, वाकड) असे या उपसंचालकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी एमआयडीसीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्याची बिले सातारा औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सुरक्षा व कामगार विभाग कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. ५८ हजार ४०० रुपयांच्या बिलाच्या ३० टक्के प्रमाणे १७ हजार ५२० रुपयांची लाच उपसंचालक नंदकिशोर देशमुख याने मागितली होती.
शल्यचिकित्सकांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात याची तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पडताळणी केल्यावर देशमुख याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना नंदकिशोर देशमुख याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत , पोलीस नाईक गणेश ताटे, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी ही कारवाई केली.