राज्यात पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज

दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 3 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, डिसेंबरची सुरुवात पावसाने होत असून, शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत आहेत. त्यामुळे डिसेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे ; कारण बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा पावसाचा राहणार आहे. पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला आहे.
राज्यात 1 डिसेंबर रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा पाऊस 2 डिसेंबर रोजी कमी होणार आहे. लगेच 3 डिसेंबरपासून चक्रीवादळास सुरुवात झाली, तर हा पाऊस पुन्हा वाढू शकेल, असा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.