ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका ; नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

अवकाळी पाऊस, गारपिटीचा अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल झाल्या आहेत. 16 जिल्ह्यांत नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

काही भागांत झालेल्या गारपिटीने फळबागांचेही नुकसान झाले आहे. राज्यात सध्या खरीप हंगामातील भातपिकाची काढणी सुरू आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने काढणीच्या अवस्थेतील भातपिकास फटका बसला आहे.

खरीप ज्वारीच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. याबरोबरच कांदा, कापूस या पिकांनाही फटका बसला आहे. गारपिटीमुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, मोसंबी, लिंबू आदी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

प्रत्यक्षात मंत्रालयस्तरावरून पीक नुकसानीबाबतच्या लेखी सूचना मंगळवारी (दि. 28) जारी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत नुकसान झालेल्या पिकांच्या क्षेत्राचा नेमका आकडा समोर येईल, अशी माहिती कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी दिली.

ते म्हणाले की, नुकसानीच्या प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे 50 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारपासून पिकांच्या नुकसानीची आकडेवारी उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर नुकसान क्षेत्राची नेमकी स्थिती समोर येईल. राज्यात रब्बी हंगामात सुमारे 60 लाख हेक्टरवर पेरण्या अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

स्थानिक स्तरावर महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याची कामे हाती घेतली आहेत; पण अनेक शेतांमध्ये सध्या गुडघाभर पाणी कायम असल्याने पंचनाम्याला अडचणी येत आहेत. एकूणच अवकाळी व गारपिटीने दिलेला तडाखा बघता नुकसानीचे आकडे वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

पुणे जिल्ह्यात 13 हजार हेक्टरवरील पिकांना फटका अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 13 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला, तर अहमदनगरमधील संगमनेर, अकोले, पारनेर या तालुक्यांत गारपीट झाल्याने फळबागांना हानी पोहोचली.

नाशिक जिल्ह्यात 890 गावांमधील 32 हजार 833 हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. निफाड, चांदवड, नांदगाव, इगतपुरी व दिंडोरी या पाच तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल व कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात अवकाळीने सर्वात जास्त नुकसान झाले असून, 9,294 हेक्टरवरील द्राक्ष, मका, गहू, कांदा, ऊस तसेच भाजीपाला मातीमोल झाला.

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यात भात झोडणी व मळणीवर पाणीच पाणी झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणचे ऊस भुईसपाट झाले, तर ज्वारी व मळणीसाठी ठेवलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात कापूस, पपई, केळीसह इतर पिकांनाही फटका बसला आहे. धुळ्याच्या साक्री, पिंपळनेर परिसरात सोयाबीन, मका, तांदूळ, नागली मसूर, भगर या पिकांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांतही मोठे नुकसान आहे.

जालना, परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीची नोंद

मराठवाड्यात रविवारी मध्यरात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने मुसळधार सरी कोसळण्यास सुरुवात झाल्याने विभागातील जालना 70.7 मि.मी., परभणी 65 मि.मी., हिंगोली 65.8 मि.मी.ची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यासोबतच 107 मंडळांचा यात समावेश आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे कापसासह सोयाबीन, मका, गहू, हरभर्‍याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks