लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

दाखल झालेल्या गुन्ह्यावरून प्रतिबंध कारवाई करून अटक न करण्याकरिता 1500 रुपये लाच स्वीकारताना शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे (वय – 33 शिवराम पाटील नगर, शिरपूर, जि. धुळे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने हि कारवाई बुधवारी (दि.22) केली.
याबाबत 33 वर्षाच्या व्यक्तीने धुळे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे शिरपूर येथील रहिवासी असून त्यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यावरून प्रतिबंध कारवाई करून अटक न करण्याकरिता पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत धुळे एसीबी कार्य़ालयात तक्रार दिली.
धुळे एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस नाईक टाकणे यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपये लाच मागून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे याला रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील , पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी ,पोलीस अंमलदार राजन कदम, संतोष पावरा, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.