ऊस दरप्रश्नी गुरुवारी शिरोली नाका येथे महामार्ग रोखणार : राजू शेट्टी ; ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता

शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आणि ऊस दरप्रश्नी सुरू असलेले आंदोलन चिघळविणार्या सूत्रधारांना गुडघे टेकायला लावू, असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. यापुढे आरपारची लढाई सुरू होईल. गुरुवारी (दि. 23) शिरोली नाका येथे महामार्ग रोखणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
ऊस दर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी समिती नेमण्याचा केवळ फार्स होता. या समितीचा अहवाल आम्हाला मान्य नाही, असे सांगून शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी तोड झालेल्या उसाला 400 रुपये व चालू गळीत हंगामात 3,500 रुपये भाव प्रतिटन मिळाला पाहिजे, यावर आपण ठाम आहोत. समितीने दिलेल्या अहवालात कारखानदारांना गेल्या वर्षीच्या उसाला जादा रक्कम देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. परंतु, कारखानदारांनी दिलेली आकडेवारी जिल्हाधिकार्यांनी पाहिली असती, तर 400 रुपये देता येऊ शकतात, हे त्यांना हे समजले असते. शेतकर्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे द्यायचेच नाहीत हेच या अहवालावरून दिसून येते, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
शेतकर्यांची एकजूट मोडून काढण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ व आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकवटले आहेत, असेही शेट्टी म्हणाले.
काही कारखान्यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. परंतु, त्यांच्यावर दबाव आणून ती चर्चा थांबविली. सरकार, जिल्हा प्रशासन, विरोधी पक्ष आणि कारखानदार सर्वच शेतकर्यांच्या विरोधात असल्यामुळे आता जे व्हायचे ते रस्त्यावर होईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.