बोरवडे गावच्या सदैव ऋणात राहीन : आ. हसन मुश्रीफ; विकासकामांचा लोकार्पण व सत्कार सोहळा संपन्न

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
बोरवडे गाव माझ्या मतदारसंघात नसते तर कदाचित मी आमदार, मंत्री झालो नसतो. या गावाने सातत्याने माझी पाठराखण करुन मला बळ दिले. २५ वर्षांत या गावाला विकासकामांच्या बाबतीत नेहमीच झुकते माप दिले असून यापुढील काळातही लागेल ती सर्व मदत देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या गावचे माझ्यावर अनंत उपकार असून अखेरच्या श्वासापर्यंत गावच्या ऋणात राहीन, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले.
बोरवडे ( ता. कागल ) येथे आ. हसन मुश्रीफ यांच्या फंडातून पूर्ण झालेल्या ११ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा व मान्यवरांच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. प्रारंभी आ. हसन मुश्रीफ यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संयोजकांनी कार्यक्रमाचे केलेले नेटके नियोजन आणि सभेला झालेली मोठी गर्दी यांमुळे आ. मुश्रीफ भारावून गेले होते.
प्रास्ताविकात माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे म्हणाले, पाच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघातील सर्वच गावांना विकासकामांच्या बाबतीत समान न्याय देण्याचा प्रयत्न केला.आ. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यांनी या मतदारसंघाची टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आली याचे समाधान आहे.
माजी आ. संजयबाबा घाटगे म्हणाले, फराकटे कुटुंबियांना समाजसेवेचा वारसा लाभला असून त्यांनी जनमाणसात अढळ स्थान निर्माण केले आहे.कार्यकर्त्यांना तळ हातावरील फोडाप्रमाणे जपण्याचे व त्यांना बळ देण्याचे काम गणपतराव फराकटे यांनी केले असून मनोज फराकटे यांचे भविष्य उज्वल आहे.
यावेळी बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे, रणजीत पाटील ( मुदाळ ), माजी सभापती जयदीप पोवार, महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, दिनकरराव कोतेकर, विकास पाटील, सरपंच गणपतराव फराकटे, उपसरपंच मंगल साठे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत अशोक कांबळे यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच रघुनाथ कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन सुनील माजगावकर यांनी केले तर आभार सुजाता फराकटे यांनी मानले.
गंगा आटली असली तरी विकासकामे थांबणार नाहीत…
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. अडीच वर्षांच्या काळात जास्तीत जास्त निधी मतदारसंघात खेचुन आणला. त्यामुळे गावोगावी कोट्यावधींची विकासकामे उभा राहिली. परंतू आता सत्ता गेल्याने निधी मिळण्यास अडचणी येतील. निधीरुपी गंगा आटली असली तरी आमदार फंड आणि जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करण्यात मागे पडणार नाही. तालुक्यात निधीअभावी एकही विकासकाम थांबणार नाही ; अशी ग्वाही आ. मुश्रीफ यांनी यावेळी दिली.