कागलमध्ये उद्या शाहू कारखाना पुरस्कृत भव्य कुस्ती मैदान ; प्रथम क्रमांकासाठी भिडणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथे गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त शनिवारी (ता.१८) भव्य कुस्ती मैदान होणार आहे. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होत असलेले हे मैदान ऐतिहासिक यशवंत किल्ला,सांगाव नाका येथे दुपारी तीन वाजता होईल. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २०२१चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड व सुदेश ठाकूर यांच्यामध्ये लढत होणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे मैदान होईल.
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनातून या मैदानाचे आयोजन केले जात आहे.त्यामुळे लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला चालना मिळत आहे.
या मैदानातील अन्य प्रमुख लढती अशा आहेत. अरुण बोंगार्डे विरुद्ध अभिजीत मोरे,पांडुरंग शिंदे विरुद्ध आकाराम कोळेकर, अनिल चव्हाण विरुद्ध सुनील करवदे, कृष्णात कांबळे विरुद्ध गणेश कारंडे, प्रदीप ठाकूर विरुद्ध अभिजीत भोसले, जमीर मुल्लाणी विरुद्ध रोहित जाधव, राम कांबळे विरुद्ध अक्षय चौगुले, प्रतीक म्हेतर विरुद्ध सुरज पाटील, विनायक वास्कर विरुद्ध केदार पाटील. यासह नेमलेल्या इतर सव्वा दोनशेहून अधिक कुस्त्या या मैदानात होणार आहेत.