समरजितसिंह घाटगे यांचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी मानले आभार

कागल प्रतिनिधी :
शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.व त्यांचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची कागल तालुक्यातून संस्था गटातून बिनविरोध निवडीसाठी उमेदवारी आर्ज मागे घेऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने, तालुका अध्यक्ष विकास पाटील – कुरुकलीकर,बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले यांचा समावेश होता. यावेळी शाहू साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील हेही उपस्थित होते.
श्री घाटगे यांच्या कोल्हापूर येथील नागाळा पार्कमधील निवासस्थानी या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात राजे गटाकडून चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये शाहूचे संचालक युवराज पाटील, डी. एस. पाटील, दत्तामामा खराडे, प्रताप पाटील यांचा समावेश होता. काल दुपारी राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते व मंत्री मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते व मंत्री मुश्रीफ यांच्याशी झालेल्या थेट चर्चेमध्ये त्यांच्या विरोधात असलेले हे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले व मंत्री मुश्रीफ यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.गैबी चौकामध्ये झालेल्या मंत्री मुश्रीफ यांच्या सत्कारावेळीही त्यांनी बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.