कागल येथील राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनास दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी ; एक कोटी किंमतीचा महाकाय गजेंद्र रेडा ; पाच लाखाचा खिलार खोंड तर मुका घेणारी ऐश्वर्या गोमाता ; राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनातील आकर्षण

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनात १५० हून अधिक जनावरे सहभागी झाली आहेत. श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन शिक्षण संकुलच्या मैदानावर हे प्रदर्शन कालपासून सुरू झाले आहे. ते सोमवार ता. २५ पर्यंत चालणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू ग्रुप, राजे फाउंडेशन तिरुमला ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन होत आहे. यामध्ये दीड टन वजनचा, एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा खास आकर्षण ठरत आहे. पाच वर्षे वय असलेल्या मुरा जातीच्या या रेड्याची उंची सहा फूट, लांबी दहा फूट आहे. तो कर्नाटकातील मंगसुळी येथील विलास नाईक यांच्या मालकीचा असून कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश मधील कृषी प्रदर्शनात खास आकर्षण ठरत आहे.
दुसरे आकर्षण म्हणजे दररोज १५ लिटर दूध,दोन किलो सफरचंद, दोन किलो सरकी पेंड, दोन किलो आटा व नियमित वैरण असा त्याचा खुराक आहे. ऐश्वर्या नावाची माणसांचा मुका घेणारी गोमाता ही आहे.
काजळी खिलार जातीची अडीच वर्षाची ही पाडी सहा महिन्याची गाभण आहे. चंद्रे ता.राधानगरी येथील बाबासो पाटील यांच्या ही मालकीची आहे. पंढरपूरच्या विठ्ठल बिचकुले यांच्या मालकीचा पंढरपुरी काजळी खिल्लार जातीचा पाच लाख रुपये किमतीचा खोंड सुद्धा आकर्षण ठरत आहे. त्याची शिंगे डोळे, कान,नाकपुड्या,शेपुट गोंडा सर्व काळ्या रंगाचे आहे. सहा फूट उंची, दोनदाती, तीन वर्षाचा हा खिल्लार खोंड पैदाशीसाठी वापरला जातो. पिंपळगाव खुर्द येथील महेश आवटे यांच्या मालकीचा चार महिन्याचा हरण या नावाचा खोंड खुर्चीवर पुढील दोन पाय खुर्चीवर ठेवून उभा राहतो. आप्पाचीवाडी ता.निपाणी येथील बाबुराव खोत यांची जुळ्या सारखी असलेली रुबाबदार व भारदस्त बैल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच आप्पासो खोत यांचा राजा नावाचा पंजाबी दीडशे किलो वजनाचा चार फूट उंचीचा व पाच फूट लांबीचा पंजाबी पालवा सुद्धा विशेष आकर्षण ठरत आहे. त्याचे सव्वा फूट लांबीचे कान व दीड फूट लांबीची शेपूट आहे. संयोजका मार्फत खिलार गाय व बैल विभागात आदत, दोन ते चारदाती व सहा दातीपासूनपुढे अशा तीन गटात स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत उत्कृष्ट गाय व बैलासाठी राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.या प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्यासह सोलापूर पंढरपूर सांगोला करमाळा सांगलीसह सीमाभागातील जनावरे दाखल झाली आहेत.
खाऊ गल्ली व मनोरंजनही ……
या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी बालचमू साठी पाळणे व इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. तर खाऊ गल्ली मध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉलवर नागरिक गर्दी करत आहेत. विशेषतः सांगली जिल्ह्यातील भरलेलं वांग व दही धपाटा,ब्रेड रोल, कर्नाटकातील बोंड भाजी आदी स्टॉलवर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.