मुरगुड : मराठा समाजाकडून छगन भुजबळांचा निषेध

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिका आहे. ते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत मुरगुड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भूजबळ यांचा जाहिर निषेध करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना ओंकार पोतदार म्हणाले, “ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदाने या महाराष्ट्रामध्ये नांदत आहेत. छगन भुजबळ यांच्यासारखे जबाबदार मंत्री आरक्षण विरोधी भूमिका घेऊन दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लक्ष दयावे. त्यांच्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दत्ता मंडलिक, कॉम्रेड अशोक चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी अमर सनगर, संजय भारमल मंडलिक, मयूर सावर्डेकर, सर्जेराव भाट, विशाल मंडलिक, राजेंद्र चव्हाण, सचिन मांगले, सुरेश साळोखे, निशांत जाधव, पृथ्वीराज चव्हाण, रणजीत मोरबाळे, संकेत भोसले, विक्रम गोधडे यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.