कोल्हापूर : ग्रामपंचायतींमधील ओबीसी सदस्य होणार कमी ; राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी
ग्रामपंचायतीमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या संवर्गाच्या जागा कमी होणार आहेत. ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांवर जाणार नाही, याची दक्षता घेऊन अतिरिक्त होणार्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाला देण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यात पुढील महिन्यात होणार्या पोटनिवडणुकीत याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मात्र, राज्य शासनाने अध्यादेश काढून नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे एकूण आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना एकूण आरक्षण 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवले जाणार आहे. या निर्णयांची सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अंमलबजावणी होणार आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या निर्णयाची एकाचवेळी व्यापक अंमलबजावणी केली जाणार आहे. याकरिता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात ओबीसी सदस्य संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार पोटनिवडणुकीतील ओबीसी सदस्यत्व निश्चित केले जाणार आहे.