ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तु विक्री केंद्राचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तू, फराळ, पणत्या व आकाश कंदील अशा वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

दिवाळी मेळावा – २०२३ या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, काही कारागृह पोलिसांमुळे अलीकडच्या काळात कारागृहात मोबाईल, तस्करी, गांजा, तंबाखू अशा कारणांवरून या विभागाची मलीन झालेली आहे. ही प्रतिमा प्रामाणिकपणाने काम करून बदलावी लागेल. आज जरी कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी असले तरी ती हाडामासाची, मन, भावना आणि हृदय असलेली माणसच आहेत. तेव्हा त्यांच्यात वर्तन बदल होईल या भावना समोर ठेवून प्रयत्न करायला हवेत. कारागृहात बंदींना वस्तू, फराळ, विविध वस्तू बनविण्यासाठी मिळणारे हे प्रशिक्षण, शिक्षा संपल्यानंतर बाहेर जाऊन उर्वरित आयुष्याच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्रात विविध कारागृहातील बंदीजणांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारात ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, पोलीस महानिरीक्षक स्वाती शेळके यांच्या प्रोत्साहनातून महाराष्ट्रभर असे उपक्रम सुरू आहेत. अशा प्रयोगांमधून कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदीजन आणि समाजामध्ये सलोखा रहावा, असा आमचा प्रयत्न आहे. बंदीजणांनी रात्रंदिवस राबून मोठ्या परिश्रमाने या वस्तू तयार केल्या आहेत.

यावेळी कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, उपअधीक्षक साहेबराव आडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सोमनाथ मस्के, कारखाना व्यवस्थापक शैला वाघ, वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, कारखाना तुरुंग अधिकारी प्रवीण आंधेकर, तुरुंग अधिकारी अविनाश भोई, तुरुंग अधिकारी विठ्ठल शिंदे, प्रा. मधुकर पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे विक्री प्रदर्शन 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कळंबा कारागृह आवारात भरवण्यात आलेल्या या विक्री प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी कारागृहाच्या वतीने करण्यात आले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks