व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ; सांगलीतील तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील खानापुर तालुक्यात पीडित मुलीच्या मामाच्या घराजवळील म्हशीच्या गोठ्यात आणि शेतात घडली आहे. याबाबत पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-37) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत सुरेश माने (वय-20 रा. बत्तीस शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 363, 504, 506, पोक्सो कलम 3,4,6,8,10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्यातील धायरी परिसरात राहते.ती गणपती उत्सवासाठी खानापुर तालुक्यातील वेझेगाव येथे मामाकडे गेली होती.आरोपीने पीडित मुलीला मामाच्या घराजवळ असलेल्या म्हशीच्या गोठ्याजवळ भेटण्यास बोलावून घेतले.त्यावेळी त्याने तुझे माझ्याकडे व्हिडीओ आहेत ते व्हायरल करेन अशी धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
यानंतर तिला मारहाण करुन त्याच्या दुचाकीवरुन एका ज्वारीच्या शेतात घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत अत्याचार करुन तिला तेथेच सोडून दिले.हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजताच त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव करीत आहेत.