ब्रेकिंग : दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई –
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अखेर दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यावर चर्चा झाली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर सर्वांची मते जाणून घेतल्यावर दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे पुढे ढकलण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दहावी-बारावीच्या परीक्षांचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, अशी मागणी केली.
राज्यात रविवारी (ता. ११ एप्रिल) 63 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांकडून दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. परीक्षा तोंडावर आल्या तरी राज्य सरकारचा निर्णय होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि प्रस्तावित लॉकडाऊनचा निर्णय पाहता, राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
कधी होणार आता या परीक्षा ?
दहावीची परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.